सिडकोची 144 दुकाने विक्रीसाठी उपलब्ध; जाणून घ्या बेस रेट, ठिकाणे आणि ई-लिलावाचे वेळापत्रक

CIDCO 144 Shops Sale : सिडको (CIDCO) महामंडळातर्फे नवी मुंबईतील वाणिज्यिक विकासासाठी १४४ व्यावसायिक दुकाने आणि किऑस्कची ई-निविदा आणि ई-लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या विक्री योजनेअंतर्गत बामणडोंगरी (उलवे), खारघर आणि तळोजा या तीन विकसित नोड्समध्ये एकूण १४० दुकाने आणि ४ किऑस्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या योजनेतील ठिकाणे आणि त्यांच्या प्रती चौरस मीटर बेस रेटचा तपशील निश्चित करण्यात आला आहे. बामणडोंगरी (उलवे) येथे १२ दुकाने उपलब्ध असून, त्यांचा बेस रेट ३,०४,००६ रुपये आहे. खारघरमधील सेक्टर-३६ येथील स्वप्नपूर्ती योजनेत ८ दुकाने आणि ४ किऑस्क उपलब्ध आहेत, ज्यांचा बेस रेट २,१५,२९० रुपये प्रती चौरस मीटर आहे. तसेच, तळोजा नोडमध्ये सेक्टर-३४ (भूखंड क्र. १ आणि ६) आणि सेक्टर-३६ (भूखंड क्र. १ आणि २) मिळून एकूण १२० दुकाने उपलब्ध आहेत. तळोजामधील या सर्व दुकानांसाठी १,८३,८५० रुपये प्रती चौरस मीटर इतका समान बेस रेट निश्चित करण्यात आला आहे. ई-लिलावामधील बोली या बेस रेटच्या वर लावली जाते.

या सर्व व्यावसायिक जागांची कनेक्टिव्हिटी उत्तम आहे. या नोड्समध्ये रस्ते आणि रेल्वेचे जाळे प्रस्थापित झाले असून तळोजा परिसरासाठी मेट्रोची सुविधा सुरू झाली आहे. याव्यतिरिक्त, अटल सेतू (MTHL), नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीटी (JNPT) या प्रकल्पांच्या जवळ असल्यामुळे या ठिकाणांना व्यावसायिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

या ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सिडकोने वेळापत्रक जाहीर केले आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता सुरू झाली असून ती ३० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री २३:५९ वाजेपर्यंत सुरू राहील. अर्जदारांना अनामत रक्कम (EMD) व प्रक्रिया शुल्क भरणे तसेच बंद निविदा (Closed Bid) सादर करण्याची प्रक्रिया १६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत पूर्ण करायची आहे. यानंतर प्रत्यक्ष ई-लिलाव २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी १७:०० या वेळेत पार पडेल. या प्रक्रियेचा निकाल शक्य झाल्यास ७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १५:०० वाजता घोषित केला जाईल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी सिडकोच्या ‘eauction.cidcoindia.com’ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, तसेच महाव्यवस्थापक (गृहनिर्माण) कार्यालय, ३ रा मजला, रायगड भवन, सीबीडी बेलापूर येथे संपर्क साधता येईल.

Leave a Comment